Tuesday, December 18, 2018

दातांची काळजी-३

विषय-दातांची काळजी भाग-३

प्रश्न:
१.हिरड्यांमधून रक्त येतं ,काय करावं?
२.हिरड्या मजबूत होण्यासाठी काय करावे?

तुम्ही दातांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात,दिवसातून दोनदा ब्रश करताय, दंतरोगत ज्ञाना दाखवताय ,तरीही एके दिवशी सकाळी ब्रश करताना ,तुमच्या थुंकीमध्ये रक्त दिसतं आणि तुम्ही अगदी चिंताग्रस्त होता,मनात नको नको ते विचार येतात आणि तेव्हा डेंटिस्टकडे भेट दिल्यावर तो सांगतो ,घाबरू नका ,हिरडया सुजल्या आहेत ..
हुश्श!   अगदीच घाबरायची गरज नाही !हिरड्यातून रक्त येणं हे हिरडयाच्या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे ..अलार्म च म्हणा ना !

सुरवातीला आपण दातांच्या आधार (support) यंत्रणेची माहिती घेऊ ..

🔶निरोगी हिरड्या ह्या घट्ट ,गुलाबी रंगाच्या व दातांच्या वरच्या भागापर्यंत म्हणजेच क्राऊन पर्यंत दाताला घट्ट चिकटलेल्या असतात.दात हाडाच्या खोबणीत घट्ट रुतलेले असतात.दाताच्या सभोवतालची हिरडी, हाडाची खोबण व हाडाच्या खोबणीतील मुळाभोवतालचे धागे ह्या सर्वांना दाताचा *परिवेष्टन कोष* असे म्हणतात.

आपल्याला हिरडयांचा आजार आहे किंवा सुरू झाला आहे  हे कसे ओळखावे ?

१.हिरड्या मऊ लिबलिबित होऊन स्पर्श झाला तरी रक्त येतं.
२.हिरड्या दातापासून विलग झालेल्या दिसतात.
३.त्या लाल दिसतात.
४.हिरड्या सळसळतात.
५.दात दोन वेळा घासले तरी दुर्गंध येतो .
६.दात हलू लागतात.
७.दातांची मुळे दिसू लागतात.
८.दातांमध्ये पूर्वी नसलेल्या फटी दिसतात. किंवा आहेत त्या फटी वाढू लागतात.

जोपर्यंत रुग्णाला त्रास होत नाही तोपर्यंत ह्या आजाराचे गांभीर्य न कळल्याने बऱ्याच वेळा प्रतिबंधात्मक अवस्था निघून गेलेली असते.

कारणे

🔶१.हिरडयाच्या आजारांमध्ये,प्रमुख कारण हे  दात आणि हिरड्या ह्यामधील जागेत जो प्लाक् (जीवाणू व अन्नाच्या राहिलेल्या कणांनी तयार झालेला थर ,ह्यामुळे किटण तयार होते ते काही काळानंतर घट्ट होऊन (calculus ) कॅलक्युलस किंवा टार्टर हिरड्यांना खाली ढकलते आणि त्यातील विषद्रव्यांमुळे हिरड्या त्यांच्या जागेवरून बाजूला जातात व त्यांना सूज येते ..
🔶२.एक बाजूने चावून खाणे
🔶३ .चुकीच्या पद्धतीने ब्रश वापरणे
🔶४.खाण्याच्या चुकीच्या सवयी
🔶५.सिगारेट, अल्कोहोल पिणे,तंबाखू खाणे ,ह्यामुळे .
🔶६.वेडेवाकडे दात
🔶७.ब्रक्सिझम
🔶८.मधुमेह

उपाय :

  prevention is better than cure
  a stitch in time saves nine ...
ह्या म्हणी अगदी योग्य ठरतात ,दातांच्या आजारांच्या बाबतीत ..

प्रतिबंधात्मक उपाय :

🔶१.रुग्णांना ,सर्व सामान्य लोकांना दंतारोग्याबद्दल  जागृत करणे
🔶२ .टूथब्रश व  फ्लुओरिडेटेड टूथपेस्टच्या साहाय्याने दात घासणे.
🔶३.इतर मुख स्वच्छतेची साधने जसं  डेंटल फ्लॉस ,माऊथ वॉश वापरणं.
🔶४.दातांच्या ,हिरड्यांच्या आरोग्यासाठी योग्य असा आहार घेणे.
🔶५.आजार असेल तर दंतरोगतज्ञाना दाखवून उपचार करणे.
ह्यात
🔶 स्केलिंग व पॉलिशिंग -ह्या उपचारांतर्गत रुग्णाच्या दातांवरील व दात व हिरड्यांमधील साचलेले किटण काढले जाते ,अल्ट्रासोनिक स्केलर च्या सहाय्याने..जी अगदी कमी वेदना देणारी उपचारपद्धती आहे .ज्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी  ध्वनीतरंगांचा वापर टार्टर जागेवरून हलवण्यात व काढण्यात होतो.
त्यांनंतर   दातांचे पृष्ठभाग पॉलिश केले जातात,ज्यामुळे  दातांवरील खडबडीतपणा कमी  होतो ..
🔶ज्या रुग्णामध्ये हिरड्यांच्या आजाराची तीव्रता वाढली आहे त्या केसेसमध्ये कधी कधी
'डीप स्केलींग' करावं लागतं .
🔶जिथे खोबणीतील हाडाची झीज झाली आहे तिथे बोन -ग्राफ्टींग करावं लागतं.
🔶स्केलिंग केल्यानंतर दर सहा  महिने ते एक वर्षांने पुन्हा चेक अप केल्याने हिरड्यांचे आरोग्य कसे आहे ते कळते शिवाय तुमचे डॉक्टर जवळून दात पाहत असल्याने कुठे नवीन कीड सुरू झाली आहे का हेही समजतं..

गैरसमजुती

बऱ्याच वेळा असं रुग्ण विचारतात की डॉक्टर दात साफ केल्याने हलके होत नाहीत ना ?
अगदी साफ चूक ,दातांना कधी कधी टार्टरने एवढं घट्ट पकडलं असतं की दात साफ झाल्यावर दातांचे हलणे  जे अगोदरच झालेले असते ते दिसून येते ..

थोडक्यात, हिरड्यांचा आजार जरी खूप कॉमन असला तरी तो योग्य काळजी व उपाय केल्यास नक्कीच थांबवता येतो ..आणि निरोगी हिरड्या आणि उत्तम आधार आपल्या  दातांना दीर्घायुष्य देऊ शकतो ..

🔷सल्ला-अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या!🔷

धन्यवाद!

डॉ. अर्चना चव्हाण(दंतरोगतज्ञ)-९८५०९८८५४१
वैद्यकीय गट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी

No comments:

Post a Comment