Tuesday, March 12, 2019

आला उन्हाळा ,तब्येत सांभाळा

आला उन्हाळा ,तब्येत सांभाळा

आता थंडी संपून नुकताच उन्हाळा प्रारंभ झाला आहे ,भारतात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होतो (वसंत व ग्रीष्म ऋतू)परंतु सकाळी थंडी ,दुपारी कडक ऊन असंच चित्र पहायला मिळतं आणि या अशा वातावरणात तब्येतीच्या तक्रारीसुद्धा  हळूहळू जोर धरू लागतात म्हणून योग्य आहार -विहाराने शरीरातील वात, पित्त ,कफ साम्य स्थितीत ठेवल्यास उन्हाळा सुकर होईल.

💠आहार

नुकतीच थंडी संपली .
थंडीमध्ये जो कफाचा संचय झालेला असतो, तो कफ सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पातळ होतो ,त्यामुळे जाठराग्नी(भूक)मंदावलेली असते. अशावेळेस सहज पचेल असा हलका आहार घ्यावा.

थोडक्यात उन्हाळा हा 'डायेटिंग' चा ऋतू आहे असं म्हणायला हरकत नाही.
सध्या वसंत ऋतूची सुरुवात आहे.

ऋतूराज 'वसंत' जरी नवचैतन्य निर्माण करणारा असला तरी असलेल्या मंदाग्नीमुळे हलका फुलका आहार घ्यावा .

सकाळच्या नाष्ट्याला जड पदार्थाऐवजी विविध फळांचे रस घेणे चांगले.

दुपारी हलका पौष्टिक आहार घ्यावा.
पोळी, डाळ,कमी तेलाच्या भाज्या ,कांदा, टोमॅटो, काकडी खावे, भरपूर कोशिंबीर घ्यावी.

शीतपेय,आईस्क्रीम चा मोह टाळावा .

त्याऐवजी लिंबू सरबत घ्यावे ,चहा कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावे .

बटाटा, राजमा, साबूदाणे, मांसाहाराला सुट्टी द्यावी.

ग्रीष्म ऋतूमध्ये कफ कमी होऊन वात वाढतो. यावेळी गोड, शीतल,पाचक,रसयुक्त फळे(कलिंगड, मोसंबी, आंबा,द्राक्षे )खावेत. माठातील पाणी, दही, ताक,सेवन करावे. जास्त खारट, कडू पदार्थ टाळावेत .कैरीचे पन्हे ,थंड दूध ,नारळपाणी ,पालक सूप घ्यावे.

💠विहार:

अतिउन्हात जाणे टाळावे.

सकाळी मोकळ्या हवेत फिरावे.

बाहेर जाण्याअगोदर थंड पाणी प्यावे,शक्यतो बाहेरचे पाणी पिऊ नये ,उन्हातून फिरताना छत्री,गॉगल चा वापर करावा.

त्वचा काळवंडू नये म्हणून घरचे ताजे लोणी त्वचेवर चोळावे.

सैलसर पांढरे कपडे वापरावे .

उष्णता वाढू नये म्हणून शीतल द्रव्यांची उटणी लावावीत. (अनंतमूळ,वाळा,चंदन,जेष्ठमध यांचे चूर्ण )

पायांची जळजळ कमी करण्यासाठी सकाळी लॉनवर अनवाणी चालावे .

अतिव्यायाम,उपवास टाळावा .

दिवसा थोडी झोप घ्यावी.

💠व्याधी किंवा आजार

शरीरातील पाणी कमी होते. त्याने थकवा लवकर येतो,त्यामुळे चक्कर ,भोवळ येते ,कफाचे विकार होतात .

हातापायांच्या तळव्याची आग होते.अशावेळी मनुका,धने घातलेले पाणी प्यावे .

डोळ्यांची आग होणे,जळजळणे असे प्रकार झाल्यास गुलाबजलाच्या पट्ट्या किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्यात ,लहान मुलांना घामोळं येतं.

अशावेळी खरबुजाचा गर लावावा ,लघवीला जळजळ असल्यास कपभर दुधात खडीसाखर मिसळून घ्यावे.

अतिसार,काविळीसाठी घरचे शुद्ध पाणी प्यावे. बरेचदा नाकातून रक्त येत असल्यास बर्फ लावावे.

अशाप्रकारे थोडीशी काळजी घेतली तर आपला उन्हाळा सुकर करू शकता.

डॉ.संध्या झाडे
संजीवनी हॉस्पिटल
शेडगेवाडी.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Thursday, January 3, 2019

दातांची काळजी-४

विषय:- दातांची काळजी-भाग ४

अक्कलदाढ कोणत्या वयात येते ?

आपल्या तोंडात सर्वसाधारणपणे ३२ दात असतात.

सर्वसाधारणपणे,ह्यासाठी म्हटलं की खूप लोकांना चार अक्कलदाढा येतच नाहीत ..

काही वेळा लोकांना दोन किंवा तीनच अक्कलदाढा येतात.
अक्कलदाढेचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही बरं...ज्या वेळेत अक्कल येते (थोडीफार),त्यावेळेतच अक्कलदाढा उगवत असल्याने त्यांना अक्कलदाढ
हे नाव पडलं आहे !!!

सगळयात शेवटी येणारी दाढ म्हणजे अक्कलदाढ !

साधारणपणे वय वर्षे १७ ते २५ ह्या काळात अक्कलदाढ येऊ शकते.तोंडात चार कोपऱ्यात अशा चार दाढा येतात.बऱ्याच वेळेला त्या सरळ येतात. पण अक्कलदाढा वेड्यावाकड्या येण्याचंच प्रमाण अधिक आहे ..

    का बरं असं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आदिमानवाच्या गुहेत,म्हणजे आदिमानवाच्या काळात जावं लागेल ...

आदिमानवाचा जबडा खूप मोठा होता ,दात ही मोठे असायचे.ह्यात बदल झाला तो

१.उत्क्रांतीमुळे - ह्यामुळे जबड्याचा आकार छोटा झाला.

२.तसेच बदलत्या आहारामुळेही,
जसं पूर्वी आदिमानव कच्चे मांस व फळे खत होता ,आता तो शिजवलेलं  अन्न खाऊ लागला ..

३.अन्नपदार्थांचं मऊ असणं; दातांचे घर्षण कमी करू लागले .

४.ह्या सर्वांमुळे दातांचा व जबड्याचा आकार कमी झाला .

५.छोटा जबडा व मोठे दात ह्या परिस्थितीत सर्वात शेवटी येणाऱ्या दाढांना जागा न मिळाल्याने त्या वाकड्या येऊ लागल्या ,किंवा हाडा रुतून बसू लागल्या आणि
अक्कलदाढ (कु)प्रसिद्ध झाली ..

अ) काय होतं जेव्हा अक्कलदाढ नीट येते....

तेव्हा रुग्णांना काही त्रास होत नाही ,कधीकधी तिच्या स्थानामुळे  ती नीट साफ करता येत नाही ,तेव्हा  ती किडू शकते ..तिला कीड लागली आणि शेजारील दातही नीट साफ न झाल्यामुळे किडू शकतो.आणि दाढदुखीचा त्रास होतो.अशा परिस्थितीत खूप किडलेली अक्कलदाढ काढावीच लागते.

ब) जेव्हा अक्कलदाढ नीट येत नाही तेव्हा मात्र ती तिरपी उगवते,हाडात अडकून बसते किंवा वर अर्धवट येते ,अशी अक्कलदाढ रुग्णांसाठी खूप त्रासदायक ठरते.

रुग्णाना काय काय त्रास  होतात ते आपण पाहू..

१.प्रचंड असहनीय वेदना होणे .
२.दाढे भोवतालची हिरडी सुजणे,त्यात पू होणे,
३.तोंड सुजणे
४.तोंड व्यवस्थित उघडता न येणे.
५.म्हणजेच घास घेताना पूर्ण घास तोंडात न घालता येणे .
६.त्या बाजूच्या हिरड्या ,दात,गाल दुखणे,डोके व कान दुखणे
७.चावताना जीभ चावली जाणे.
८.वरच्या अक्कलदाढेमुळे गाल घासला जाणे. इ.
९.ह्या अक्कलदाढीमुळे अगोदरची दाढ किडणे..(स्वच्छता न ठेवता आल्याने)

आपण घ्यायची काळजी व उपाय :

१.आपल्याला अक्कलदाढ येते आहे असं कळल्यास दात स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी.

२.शेवटपर्यंत ब्रश पोहोचत नाही अशा वेळेस आपण बोट शेवटपर्यंत फिरण्याचा प्रयत्न करावा.

३.अशा वेळी माऊथ वॉशही दाढ व आजूबाजूची हिरडी स्वच्छ ठेवण्याकरिता वापरता येतो.

४.त्रास /वेदना होत असतील तर दंतरोगतज्ञाना दाखवावे.

५. तेव्हा डॉक्टर प्रतिजैविके व वेदनाशामक औषधे  दुखणं व जन्तु संसर्ग कमी होण्यासाठी देतात ती वेळेवर घ्यावीत.

६.कधीकधी 'क्ष किरण' फोटो काढावा लागतो जेणेकरून दाढ कुठे अडकली आहे ते कळते व दाढ काढताना सोपे जाते.

७.हाडात अडकली असल्यास दन्त शल्यचिकित्सक (ओरल सर्जन) ला बोलावून छोटीशी शस्त्रक्रिया करून अक्कलदाढ काढता येते.

सारांशरूपात असं सांगता येईल,

'अक्कलदाढ'  जेव्हा त्रास देते तेव्हा आपल्या दंतरोगतज्ञांच्या सल्ल्यानेच  उपाय करावेत व वेदनामुक्ती मिळवावी..हे नक्की अकलेचं काम आहे.

🔷सल्ला-अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या!🔷

धन्यवाद!

डॉ. अर्चना चव्हाण(दंतरोगतज्ञ)-९८५०९८८५४१
वैद्यकीय गट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी