Tuesday, December 18, 2018

दातांची काळजी-३

विषय-दातांची काळजी भाग-३

प्रश्न:
१.हिरड्यांमधून रक्त येतं ,काय करावं?
२.हिरड्या मजबूत होण्यासाठी काय करावे?

तुम्ही दातांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात,दिवसातून दोनदा ब्रश करताय, दंतरोगत ज्ञाना दाखवताय ,तरीही एके दिवशी सकाळी ब्रश करताना ,तुमच्या थुंकीमध्ये रक्त दिसतं आणि तुम्ही अगदी चिंताग्रस्त होता,मनात नको नको ते विचार येतात आणि तेव्हा डेंटिस्टकडे भेट दिल्यावर तो सांगतो ,घाबरू नका ,हिरडया सुजल्या आहेत ..
हुश्श!   अगदीच घाबरायची गरज नाही !हिरड्यातून रक्त येणं हे हिरडयाच्या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे ..अलार्म च म्हणा ना !

सुरवातीला आपण दातांच्या आधार (support) यंत्रणेची माहिती घेऊ ..

🔶निरोगी हिरड्या ह्या घट्ट ,गुलाबी रंगाच्या व दातांच्या वरच्या भागापर्यंत म्हणजेच क्राऊन पर्यंत दाताला घट्ट चिकटलेल्या असतात.दात हाडाच्या खोबणीत घट्ट रुतलेले असतात.दाताच्या सभोवतालची हिरडी, हाडाची खोबण व हाडाच्या खोबणीतील मुळाभोवतालचे धागे ह्या सर्वांना दाताचा *परिवेष्टन कोष* असे म्हणतात.

आपल्याला हिरडयांचा आजार आहे किंवा सुरू झाला आहे  हे कसे ओळखावे ?

१.हिरड्या मऊ लिबलिबित होऊन स्पर्श झाला तरी रक्त येतं.
२.हिरड्या दातापासून विलग झालेल्या दिसतात.
३.त्या लाल दिसतात.
४.हिरड्या सळसळतात.
५.दात दोन वेळा घासले तरी दुर्गंध येतो .
६.दात हलू लागतात.
७.दातांची मुळे दिसू लागतात.
८.दातांमध्ये पूर्वी नसलेल्या फटी दिसतात. किंवा आहेत त्या फटी वाढू लागतात.

जोपर्यंत रुग्णाला त्रास होत नाही तोपर्यंत ह्या आजाराचे गांभीर्य न कळल्याने बऱ्याच वेळा प्रतिबंधात्मक अवस्था निघून गेलेली असते.

कारणे

🔶१.हिरडयाच्या आजारांमध्ये,प्रमुख कारण हे  दात आणि हिरड्या ह्यामधील जागेत जो प्लाक् (जीवाणू व अन्नाच्या राहिलेल्या कणांनी तयार झालेला थर ,ह्यामुळे किटण तयार होते ते काही काळानंतर घट्ट होऊन (calculus ) कॅलक्युलस किंवा टार्टर हिरड्यांना खाली ढकलते आणि त्यातील विषद्रव्यांमुळे हिरड्या त्यांच्या जागेवरून बाजूला जातात व त्यांना सूज येते ..
🔶२.एक बाजूने चावून खाणे
🔶३ .चुकीच्या पद्धतीने ब्रश वापरणे
🔶४.खाण्याच्या चुकीच्या सवयी
🔶५.सिगारेट, अल्कोहोल पिणे,तंबाखू खाणे ,ह्यामुळे .
🔶६.वेडेवाकडे दात
🔶७.ब्रक्सिझम
🔶८.मधुमेह

उपाय :

  prevention is better than cure
  a stitch in time saves nine ...
ह्या म्हणी अगदी योग्य ठरतात ,दातांच्या आजारांच्या बाबतीत ..

प्रतिबंधात्मक उपाय :

🔶१.रुग्णांना ,सर्व सामान्य लोकांना दंतारोग्याबद्दल  जागृत करणे
🔶२ .टूथब्रश व  फ्लुओरिडेटेड टूथपेस्टच्या साहाय्याने दात घासणे.
🔶३.इतर मुख स्वच्छतेची साधने जसं  डेंटल फ्लॉस ,माऊथ वॉश वापरणं.
🔶४.दातांच्या ,हिरड्यांच्या आरोग्यासाठी योग्य असा आहार घेणे.
🔶५.आजार असेल तर दंतरोगतज्ञाना दाखवून उपचार करणे.
ह्यात
🔶 स्केलिंग व पॉलिशिंग -ह्या उपचारांतर्गत रुग्णाच्या दातांवरील व दात व हिरड्यांमधील साचलेले किटण काढले जाते ,अल्ट्रासोनिक स्केलर च्या सहाय्याने..जी अगदी कमी वेदना देणारी उपचारपद्धती आहे .ज्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी  ध्वनीतरंगांचा वापर टार्टर जागेवरून हलवण्यात व काढण्यात होतो.
त्यांनंतर   दातांचे पृष्ठभाग पॉलिश केले जातात,ज्यामुळे  दातांवरील खडबडीतपणा कमी  होतो ..
🔶ज्या रुग्णामध्ये हिरड्यांच्या आजाराची तीव्रता वाढली आहे त्या केसेसमध्ये कधी कधी
'डीप स्केलींग' करावं लागतं .
🔶जिथे खोबणीतील हाडाची झीज झाली आहे तिथे बोन -ग्राफ्टींग करावं लागतं.
🔶स्केलिंग केल्यानंतर दर सहा  महिने ते एक वर्षांने पुन्हा चेक अप केल्याने हिरड्यांचे आरोग्य कसे आहे ते कळते शिवाय तुमचे डॉक्टर जवळून दात पाहत असल्याने कुठे नवीन कीड सुरू झाली आहे का हेही समजतं..

गैरसमजुती

बऱ्याच वेळा असं रुग्ण विचारतात की डॉक्टर दात साफ केल्याने हलके होत नाहीत ना ?
अगदी साफ चूक ,दातांना कधी कधी टार्टरने एवढं घट्ट पकडलं असतं की दात साफ झाल्यावर दातांचे हलणे  जे अगोदरच झालेले असते ते दिसून येते ..

थोडक्यात, हिरड्यांचा आजार जरी खूप कॉमन असला तरी तो योग्य काळजी व उपाय केल्यास नक्कीच थांबवता येतो ..आणि निरोगी हिरड्या आणि उत्तम आधार आपल्या  दातांना दीर्घायुष्य देऊ शकतो ..

🔷सल्ला-अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या!🔷

धन्यवाद!

डॉ. अर्चना चव्हाण(दंतरोगतज्ञ)-९८५०९८८५४१
वैद्यकीय गट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी

दातांची काळजी-२

॥आरोग्यम धनसंपदा॥

विषय:-दातांची काळजी -भाग २

चॉकलेट तोंडातील वाढणाऱ्या जीवाणूंना प्रतिबंध घालते आणि फॅट किडण्यापासून सरंक्षण करते

Chocolate can actually be good for your teeth! Yes, you read that correctly -- chocolate can prevent tooth decay. ... Cocoa beans contain tannins, polyphenols and flavonoids, each of which is a type of strong antioxidant that benefits your mouth and teeth.

https://recipes.howstuffworks.com/dark-chocolate-good-for-teeth.htm

प्रश्न : खरंच ,चॉकलेट  ने दात किडतात का ?

वर दिलेल्या लिंकवर जी माहिती आहे ती शास्त्रीय आहे .नेटवर जर आपण शोधलं तर आपल्याला समजेल की हे खरं आहे ,जे चॉकलेटबद्दल  लिहिलं आहे ते..ज्यामध्ये चॉकलेटमध्ये फ्लॉविनोइड्स आहेत,ते अँटी एजिंग आहे,हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो वगैरे वगैरे ..मग कन्फ्युजन काय आहे ते पाहू..

ह्यासाठी दात कसा किडतो ते पहावं लागेल..आपल्या दाताचं जे बाहेरचं आवरण असतं त्याला आपण  'इनॅमल' म्हणतो ,हा मिनरालाईज्ड  भाग (लेयर)असतो,व त्यावर  लाळेचा थर कायम असतो .जेव्हा एखादा खाण्याचा पदार्थ दातांमध्ये अडकतो तेव्हा बॅक्टरिआ,(जीवाणू),पातळ फिल्म तयार करतात त्याला 'प्लाक्' म्हणतात ,ह्या प्लाकमधील बॅक्टरिया दातावर हळूहळू काम करुन मायक्रोऍसिड्स तयार करतात.जे इनॅमलमधील मिनरल्स काढून टाकतात.तयार झालेले ऍसिड आणखी बॅक्टरीया ला आकर्षित करतात व मिनरल दातामधून निघून जातात व कॅव्हिटी(खड्डा) होते.ह्यालाच दात किडणे असे म्हणतात.

आता ह्यात चॉकलेटचा काय सहभाग आहे?

🔶१.खरं पहाता चॉकलेटने दात किडत नाहीत ,दात त्यातील शर्करेने किडतात. मुलं चॉकलेट खाऊन ब्रश करत नाहीत.त्यामुळे चॉकलेटमधील साखर जीवाणूंना आकर्षित करते व प्लाक्  तयार होऊन दात किडण्यास सुरुवात होते. कुठलीही गोष्ट  ज्यामध्ये साखर असते व जी दातांना चिकटू शकते,त्याने दात किडू शकतात.

🔶२.ऍसिड अटॅक-प्रत्येक वेळा जेव्हा आपण तोंडात काही घालतो (खातो) आपल्या लाळेचा पी.एच्.कमी होऊन ५.५० पर्यंत येतो ,तेवढा वेळ आपले दात आणि तोंड ह्या ऍसिडमध्ये भिजतात.हा पी.एच नॉर्मल व्हायला ४५मिनिटे लागतात.

🔶३. ह्याचाच अर्थ जेव्हा तुम्ही छोट्यातील छोटी गोष्ट जेव्हा तोंडात घालता तेव्हा तुम्ही दातांना 'ऍसिडिक पी एच' ला एक्सपोझ करता . त्यामुळे जर १० वेळा तुम्ही चॉकलेट अगदी डार्क चॉकलेट जरी खाल्ले तरीही तुमच्या दाताला कीड लागू शकते,चॉकलेटमधील साखरेमुळे नव्हे तर ऍसिड अटँकच्या वाढलेल्या प्रमाणामुळे !म्हणून दोन जेवणामध्ये खाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे व चॉकलेटस् दिली तरी जेवणाच्या वेळेत दिली गेली पाहिजेत .

चॉकलेटमधील फ्लॅविनॉईडज् दात किडण्यापासून वाचवू शकतं.परंतु त्यासाठी काही गोष्टीचा विचार करावा लागतो, जसे

अ.ते डार्क चॉकलेट आहे का ?

ब..त्यात साखर किती आहे?

क..आपण कधी खातोय ?

ड.कसं खातोय ?

🔶अ.डार्क चॉकलेट -प्लेन चॉकलेट ज्यात कोका सॉलीड्स् जास्त प्रमाणात असतात; व दूध व दुधाचे पदार्थ खूप कमी असतात किंवा नसतात.

🔶ब.साखर जीवाणूंना पोषण देते. म्हणून ती चॉकलेटमध्ये कमी प्रमाणात हवी ,किंवा ते चॉकलेट दातांना चिकटू नये असे हवे. म्हणजे साखर दातांवर फार वेळ राहणार नाही .

🔶क.सकाळी,दुपारी,संध्याकाळी जेवणाअगोदर की नंतर आणि त्यानंतर तुम्ही ब्रश करताय का ?

🔶ड.द्रव रुपात की घन रुपात,

असे अनेक घटक आहेत जे चॉकलेट खाणे व दात किडणे ह्यांशी सम किंवा व्यस्त प्रमाणात संलग्न आहेत ..

म्हणून ,जर आपल्याला मध्यम मार्ग चोखळायचा असेल तर काही गोष्टी पाळल्या पाहिजेत ..जसे

🔶१.मुलांना चॉकलेट प्रमाणातच दिली पाहिजेत. अतिरेक कशाचाही वाईटच!!

🔶२.घरातील व्यक्तींना ,आजी ,आजोबांना प्रेमाने चॉकलेटचे तोटे समजावून त्यांना आपल्या नातवंडासाठी  घरात जे नियम ठरवले आहेत ते पाळण्यास उद्युक्त केलं पाहिजे, मग एखादं वेळी मूळ कितीही आग्रह करू दे ,ती वेळ चॉकलेटची नसेल तर चॉकलेट देऊ नये.

🔶३.चॉकलेट खाल्ल्यावर ब्रश केलं पाहिजे . किंवा चूळ तर नक्की भरली पाहिजे.

🔶४.जेवण्याच्या अगोदर चॉकलेट खाल्लं तरी चालू शकतं कारण मग त्याचा  दातांवर रेसिड्यू राहत नाही .

🔶५.एकदाच चॉकलेट पूर्ण खावं, चघळत बसू नये.

🔶६.डार्क चॉकलेट शक्यतो निवडावं घेताना,मिल्क चॉकलेटपेक्षा...

🔶७.मी माझ्या मुलाच्या वेळेला त्याला सांगितलं होतं की रविवारी तू कितीही चॉकलेटस् नि बिस्किटे खा पण इतर दिवशी एकही नाही .तोही ते ऐकत असे व रविवारी प्रत्यक्षात एखादं चॉकलेट किंवा ३-४,बिस्किटे खात असे व नंतर ब्रशही करत असे.त्यामुळे त्याचे दात त्या वयातही छान राहिले,शिवाय त्याला चॉकलेट,बिस्किटे ही खायला मिळाली(त्याला हवी तेवढी) हाही एक चांगला उपाय आहे .

🔶सारांश-चॉकलेटने दात किडतात असे संशोधनात कुठेही नाही.दात किडतात ते चॉकलेट जास्त वेळ दातांवर राहिल्याने व इतर काही बाबींमुळे..

🔶हा विचार करता,चॉकलेटचे आरोग्यविषयक फायदे हवे असतील तर एवढंच म्हणू शकतो
'प्रमाणात खा,नि खाल्ल्यावर ब्रश करा..'

🔶ज्यांना हे पाळता येत नसेल त्यांनी चॉकलेट नाही खाल्लं तरी चालेल ..नाहीतर दात किडणार हे नक्कीच ..

🔷सल्ला-अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या!🔷

धन्यवाद!

डॉ. अर्चना चव्हाण(दंतरोगतज्ञ)-९८५०९८८५४१
वैद्यकीय गट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी

Saturday, December 15, 2018

दातांची काळजी-१

॥आरोग्यम् धनसंपदा||

सोशल मीडियावरचा आगळा वेगळा वैद्यकीय उपक्रम...

१.प्रश्न :दोन वेळा दात घासले तरी तोंडाला वास का येतो?

आपण सगळ्यांनी 'क्लोज अप' ची जाहिरात पाहिलीच असेल ...गंमतीचा भाग सोडा ,पण तोंडाची दुर्गंधी हा अनेक वेळेला चिंतेचा विषय होऊ शकतो.सुखी दाम्पत्य जीवनात,मित्र मैत्रिणींमध्ये, ऑफिसमध्ये हा विषय आपल्याला चिंताग्रस्त करू शकतो.

कशामुळे येते तोंडाला दुर्गंधी?या समस्या दूर करण्यासाठी काय  केलं पाहिजे?

१.तुम्ही दात कसे स्वच्छ ठेवता त्यावर तुमच्या तोंडाला वास का येतो हे अवलंबून असतं...

🔶जर तुम्ही रोज ब्रशच्या साहाय्याने दात नाही घासले आणि फ्लॉस(floss) नाही वापरला तर अन्नकण जमून रहातात व त्यावर जीवाणू(बॅक्टरिआ) जमतात,जे तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतात.

🔶आंशिक कवळी किंवा पूर्ण दातांच्या कवळ्या जर स्वच्छ नाही ठेवल्या तर दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे व राहिलेल्या अन्नकणांमुळे  तोंडाला वास येऊ शकतो.

🔶तुमचं खाणं देखील तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीला आणि उच्छवासातून येणाऱ्या दुर्गंधीला कारणीभूत असते.जसं कांदा ,लसूण ,मुळा असे विशिष्ट पदार्थ  आहारात आल्याने तोंडाला वास येऊ शकतो तो पूर्ण गंध शरीरातून नाहीसा होईपर्यंत ...

🔶हिरड्यांचे आजार हेही एक महत्त्वाचे कारण आहे .
हिरड्यांचे आजार ,दातांवरील प्लाक् (किटणातील) जीवाणूंमुळे होतो ,जे काही टॉक्सिन्स्  (विषारी /हानिकारक ) द्रव्ये सोडतात ज्यामुळे हिरडया व इतर सभोवतालच्या गोष्टींना इजा होऊन त्या आपली जागा सोडतात(सुजतात व त्यात पुन्हा जीवाणूंची वाढ होऊन तोंडाला दुर्गंधी येते.

🔶 ज्यांना dry mouth ( xerostomia)  नावाचा आजार असतो तो सुद्धा तोंडाच्या दुर्गंधीला आमंत्रण देऊ शकतो.
तोंडातील लाळ हे तोंड स्वच्छ करण्याचे काम करत असते.तोंडाद्वारे श्वसन करणे ,लाळ ग्रंथीचे आजार आणि काही औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो ज्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.

🔶जर तुम्ही तंबाखू किंवा तत्सम गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला तोंड शुष्क पडणे ,हिरड्यांचे आजार आणि तोंडाचा कॅन्सर ही होऊ शकतो.आणि तुमच्या तोंडाला दुर्गंधी येऊ शकते .

🔷प्रतिबंध व उपाय:🔷

दातांची ,हिरड्यांची आणि दातांच्या
परिवेष्टनाची स्वच्छता ,दातांचे आरोग्य सांभाळणे हे दुर्गंधी कमी करण्याचे साधन आहे.

🔸दिवसातून दोन वेळा  टूथपेस्ट ने ब्रश करणे .

🔸 डेंटल फ्लॉस वापरणे

🔸जीभ स्वच्छ ठेवणे

🔸जेवल्यावर खळखळून चूळ भरणे

🔸कवळी वापरत असाल तर ती साफ ठेवणे हे आवश्यक आहे आणि जर असा त्रास होतच असेल तर

१.दंतरोग तज्ञाकडे जाणे.
२.दात व तोंड तपासून घेणे.
३.दात व हिरड्या साफ करणे.
४.जो काही दातांचा त्रास असेल तर त्यावर उपाय करणे हाच उत्तम उपाय आहे ..
५.हिरड्यांच्या आजारावर अनेक प्रगत उपचार आहेत ते 'हिरड्या व परिवेष्टनकोशाच्या आजाराचे तज्ञ' (periodontist) करू शकतात.त्यांची मदत घेऊन आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या दुर्गंधीपासून आपण कायमची सुटका मिळवू शकतो .

संदर्भ:
१.दंतकथा - डॉ. दीपक श्रीराम मांडे
२.essentials of preventive community dentistry- सोबेन पीटर

सल्ला-दोन वेळा दात घासून जर तोंडाला वास येत असेल तर वरील कारणे पहावी लागतील.जर दातांवर किटण जमा झाले असेल तर दंततज्ञांचा सल्ला घ्या!! त्यांनी सुचवलेला उपाय अमलात आणा!!

धन्यवाद!!

वैद्यकीय गट-डॉ.अर्चना चव्हाण (B. D. S.)

९८५०९८८५४१

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी

Thursday, May 10, 2018

आरोग्यम् धनसंपदा - १

||आरोग्यम् धनसंपदा||

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे

आरोग्यम् धनसंपदा - सोशल मीडियावरचा आगळा वेगळा वैद्यकीय उपक्रम...


प्रश्न - १

फंगल इन्फेक्शन बद्दल माहिती हवी होती. गेले ६ महिन्यापासून या रोगाने मी त्रस्त आहे

उत्तर -

याला मराठीत गजकर्ण असे म्हणतात. काखेत, जांघेत व इतर घामाच्या जागी याचा प्रादुर्भाव असतो.
बरे न होण्याची २ कारणे आहेत.

कारण १ >>> औषधविक्रेत्याकडे मिळणारी स्टेरॉयड्स असलेली मलमे लावल्यामुळे तात्पुुरते बरे वाटते पण इन्फेक्शन नंतर वाढत जाते.

कारण २ >>> अपुरे उपचार घेतल्याने.

सल्ला - जवळील त्वचारोग तज्ञाला दाखवून उपचार घेणे.

डॉ. अजय आढाव
कायाकल्प क्लिनिक,व्यंकटेश अपार्टमेंट
अरण्येश्वर रोड, सहकारनगर, पुणे.
फोन : ०२०-२४२२८१७२
__________________________

ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान